Sunday, January 17, 2010

दहिसर विभागाचा मेळावा (१७/०१/१०)


रविवार दि.१७/०१/१० रोजी मुं.ग्रा.पं.च्या दहिसर विभागचा मेळावा विभागाचे अध्यक्ष श्री.जयकुमार शहा यांच्या अध्यक्षतेखाली समाज कल्याण मंदिर, दहिसर (प) येथे सं. ५.०० ते ८.३० या वेळांत झाला. संस्थापक सदस्य श्री. अशोक रावत, संस्थेचे अध्यक्ष डॅ।.रामदास गुजराथी, कार्यवाह श्रीम. ज्योती मोडक, निसर्गोपचार तज्ज्ञ श्री. अरुण जोगदेव आदि मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रज्वलनानंतर चि.निनाद व सायली शेंबेकर यांच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्री.कांबळी यांनी अहवाल वाचन केले तर श्री.होडावडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

“शाश्वत जीवनशैली” या विषयावर बोलतांना श्री.अशोक रावत यांनी गरजेपुरता उपभोग हे सूत्र संवेदनशील ग्राहकाने ध्यानांत ठेवले पाहिजे, असे आग्रहाचे प्रतिपादन केले. उत्पादनांत वाढ,वितरणांत समानता आणि उपभोगावर संयम या त्रिसूत्रीबरोबरच पर्यावरणाचे संतुलन या चवथ्या सूत्राचा अवलंब आपण केला पाहिजे. त्यासाठी मर्यादित नैसर्गिक स्रोतांचा आणि पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास होऊन मर्यादित साठे पुढील पिढीसाठी राखून ठेवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. Refuse, Reduce, Repair, Reuse, Recycle करून कचऱ्याची विल्हेवाट लावतांना त्यापासून संपत्ती कशी निर्माण करता येईल, हे पाहण्यास सांगितले.

श्री. अरुण जोगदेव यांनी माणसाला औषधांची गरज नाही हे ठासून सांगितले. चहा, कॅ।फी, साखर, डालडा, त्यात बनविलेली बिस्किटे आदि पदार्थ याद्वारे एकप्रकारे आपण विषप्राशन कसे करतो, हे त्यांनी निदर्शनास आणले. भाज्यांचे सूप, कच्चे अन्नपदार्थ, भात, पोळी खाऊन कसे निरोगी जगता येते, हे अनेक उदाहरणाद्वारे त्यांनी समजाऊन सांगितले.

डॅ।.रामदास गुजराथी व श्री. जयकुमार शहा यांनी पुरेश्या वेळेच्या अभावी थोडक्यांत, समयोचित बोलून ग्राहकांना मार्गदर्शन केले.

अंधेरी विभागांतील कार्यकर्त्यांनी श्रीम नीला म्हात्रे लिखित,दिग्दर्शित ग्राहकविषयक पथनाट्य प्रभावीपणे सादर केले.

जेवणसदृश अल्पोपहार व आभारानंतर कार्यक्रम संपला.

मुं.ग्रा.पं.च्या कार्यक्रमांचे फोटो श्री.राजेन्द्र राणे,बोरीवली यांच्या सौजन्याने उपलब्ध होतात. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.

No comments:

Post a Comment