Thursday, December 24, 2009

बदलती जीवनशैली आणि ग्राहक चळवळ.

(आधार:महाराष्ट्र टाइम्स दि.२४/१२/२००९)

डॉ. रामदास गुजराथी
अध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत

(सातत्याने विकसित होत जाणारी नवी खचिर्क जीवनशैली आपल्या देशातील नीतिमूल्यांवर घाव घालणारी आहे. कारण त्यासाठी प्रत्यक्ष उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे लागतात आणि अशा स्रोतांच्या शोधासाठी भ्रष्टाचाराच्या मार्गांचा कळत न कळत अवलंब करावा लागतो. अशी माणसं ग्राहक चळवळीला कोणता आधार देणार? आजच्या भारतीय ग्राहक दिनानिमित्त या आव्हानाचा परामर्श... )

जागतिकीकरणाच्या लाटेने केवळ आपल्या अर्थव्यवस्थेवरच परिणाम केला नसून आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर देखील दूरगामी परिणाम केला आहे. आज आपण 'भारतीय नागरिक' म्हणून नव्हे तर 'जागतिक नागरिक' म्हणून जीवन जगणे अधिक पसंत करू लागलो आहोत. परिणामी आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. नाविन्याची ओढ एकसारखी वाढत आहे.

आपली जीवनशैली बदलली म्हणजे नेमके काय घडले? या प्रश्नाचे उत्तर विस्ताराने देता येईल. परंतु काही वैशिष्ट्यपूर्ण बदलांचाच येथे मी विचार करणार आहे. ग्राहक चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून हे बदल मला प्रकर्षाने जाणवतात आणि भिववितात देखील.

गेल्या २०-२५ वर्षांत 'आहेरे' (Haves) आणि 'नाहीरे' (Have nots) मधील अंतर भरमसाठ वाढले आहे. तंत्रज्ञानाधिष्ठित समाजात ज्ञानाचे महत्त्व वाढल्यामुळे 'आहेरे' वर्गाच्या उत्पन्नात भरमसाठ वाढ झाली असून त्यांच्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक पैसा येत आहे. आज आपण आपल्या देशात तीन लाखांपासून ६८-७० लाखांच्या दरवषीर्च्या पॅकेजेसची भाषा बोलू लागलो आहोत. काही हजारांत उत्पन्न कमावले, त्यांच्या घरात आता लाखाने उत्पन्न येऊ लागले. स्वाभाविकपणे या लोकांची जीवन जगण्यासंबंधीची 'अभिप्सा' बदलली. त्यांना सर्व उत्तम दर्जाच्या आणि आकर्षक अशा गोष्टींचे आकर्षण वाटू लागले. महागड्या गोष्टींकडे कल वाढला. जगाला भेडसावणाऱ्या महागाईविषयी त्यांची तक्रार नाही. कारण त्यांना अधिक खर्च करणे शक्य आहे. म्हणून ते साध्या दुकानात न जाता मॉल्सच्या वाटेने जाऊ लागले आहेत. या ग्राहकवर्गाने 'महागड्या जीवनशैलीचा' मनापासून स्वीकार केलेला दिसून येतो. क्वालिटी महत्त्वाची, किंमत दुय्यम.

अलीकडच्या आधुनिक कुटुंबात दोन गोष्टींचा शिरकाव झालेला दिसून येतो. त्या म्हणजे, प्रत्येक गोष्टीसाठी 'होम डिलिव्हरी' आणि 'किचनलेस फॅमिली'. या दोन्ही गोष्टी बदलत्या जीवनशैलीची खास वैशिष्ट्ये आहेत. किराणा माल मागवायचाय? करा दुकानदाराला फोन आणि द्या ऑर्डर. या फोनवरील मागणीला पूर्ण करणारी 'होम डिलिव्हरी' आजची जीवनशैली बनू पाहत आहे.

त्याचवेळी मुंबई-पुणे-अहमदाबाद अशा काही शहरांत 'किचनलेस होम' ही संकल्पना रूढ होत असताना दिसत आहे. तरुण जोडप्यांनी तिचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत घराबाहेर असलेल्या या तरुण जोडप्यांना 'किचन'ची आवश्यकताच भासत नाही. सकाळचा चहा-नास्ता बाहेर. दुपारचे जेवण ऑफिसच्या कँटिनमध्ये आणि रात्रीचे घरी परतताना चांगल्या हॉटेलमध्ये. ही जीवनशैली विकसित होत गेल्यावर घर हे विश्रामगृह बनेल आणि 'आमच्या घरी जेवायला या' या वाक्याची सामाजिक जीवनातून हकालपट्टी होईल.

यातूनच 'युज अँड थ्रो कल्चर' (वापरा आणि फेका संस्कृती) उभे राहत असल्याचे दिसून येते. कोणतीही वस्तू फार काळ वापरायची नाही किंवा घरात ठेवायची नाही. वस्तू वापरायची आणि तिची अल्पकाळातच विल्हेवाट लावायची हे या कल्चरचे वैशिष्ट्य. माझ्या आईचे लग्न १९व्या वर्षी झाले, पण वयाच्या ५०व्या वर्षापर्यंत लग्नातील शालू तिच्याजवळ होता. तिला त्याचा अभिमानही वाटे. पण आता कोणतीही वस्तू लवकर 'रिप्लेस' करण्याची प्रवृत्ती वाढत आहे.

२०-२५ वर्षांपूवीर् प्रत्येक घरात टेलिफोन होता अशी स्थिती नव्हती. पण कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीने क्रांती घडवून आणली असून आज 'मोबाईल' हे एक खेळणे झाल्यासारखे वाटते. माध्यमिक शाळेत जाणाऱ्या मुलामुलींपासून वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या व्यक्तीच्या हाती मोबाईल दिसून येतो. मोबाईलशिवाय अनेकांचे काम अडते. इतका मोबाईल आपल्या आजच्या जीवनात अविभाज्य झाला आहे. नाशिकला ११० मोबाईल टॉवर्सना सील ठोकले, तर लाखाच्यावर मोबाईल बंद पडले. सर्व ग्राहक जाहीर तक्रार करू लागले. ही स्थिती सर्व भारतभर आहे.

अशा या बदलत्या जीवनशैलीचा देशातील ग्राहक चळवळीवर काय परिणाम होणार हा खरा चिंतेचा प्रश्न आहे. उपभोगप्रधान समाजातील ग्राहक देशातील ग्राहक चळवळीला उपयुक्त ठरतील का, हा खरा सवाल आहे. अशा उच्चभ्रू समाजातील लोकांना ग्राहक चळवळीची आवश्यकता वाटेल का? असे ग्राहक सहजरीत्या संघटित होतील का? पैशाच्या जोरावर ते सर्व प्रकारचे सुख उपभोगू शकतात. त्यांना ग्राहक चळवळ आवश्यक वाटेल का? अशा ग्राहकांचे प्रश्न सामान्य ग्राहकांच्या, गरीब ग्राहकांच्या प्रश्नांपेक्षा भिन्न असणार यात शंका नाही. इंटरनेटच्या जमान्यात वावरणारे हे सुशिक्षित आणि उच्च मध्यम वर्गातील ग्राहक एकत्र येऊन ग्राहक चळवळ समर्थ करण्यास किती उपयुक्त ठरतील, याविषयी मी साशंक आहे. म्हणून इंटरनेटच्या युगातील ग्राहक चळवळीसंबंधी गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता ग्राहक संघटनांपुढे निर्माण झाली आहे.

आजच्या तरुण ग्राहकांच्या उपभोगविषयक सवयी अत्यंत 'खचिर्क' होत चालल्या आहेत. याचाच अर्थ त्यांच्याकडून टिकावू (sustainable) जीवनशैलीचा अव्हेर होत आहे. भारतीय समाजात टिकावू जीवनपद्धतीचा शतकानुशतके अवलंब केला गेला पण गेल्या २०-२५ वर्षांत विचित्र चित्र निर्माण होत असल्याचे दिसते. उपभोगावर संयम ठेवणे आवश्यक आहे याची जाणीव करून द्यायला हवी आहे, कारण कर्ज काढून उपभोग घेण्याची वृत्ती वाढत आहे. पूवीर्चा अशिक्षित ग्राहक कर्ज काढून थाटात मुलीचे लग्न करायचा आणि व्यापारी आणि सावकाराकडून लुबाडला जायचा. तशीच परिस्थिती या सुशिक्षित केडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड धारकांची होत आहे. ग्राहक चळवळीपुढे हे एक वेगळेच आव्हान आहे.

सातत्याने विकसित होत जाणारी ही नवी जीवनशैली आपल्या देशातील नीतिमूल्यांवर घाव घालणारी आहे. कारण खचिर्क जीवनशैली जगण्यासाठी प्रत्यक्ष उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्नाचे सोत निर्माण करावे लागतात आणि अशा सोतांच्या शोधासाठी भ्रष्टाचाराच्या मार्गावर कळत न कळत चालत जावे लागते. नंतर तो मार्ग स्वीकारला जातो. आज अशी माणसे या नवीन जीवनशैलीचा यथेच्छ उपभोग घेताना दिसत आहेत. अशी माणसं ग्राहक चळवळीला कोणता आधार देणार? आणि ग्राहक चळवळ 'अशा' ग्राहकांच्या आधारावर का चालवायची याचाही विचार करावा लागणार.

पुढील दहा वर्षांत जीवनशैली अशीच वेगाने बदलत गेली तर ग्राहक चळवळ ही 'कागदावरील चळवळ' या स्वरूपात राहील किंवा समाजातील केवळ उपेक्षित ग्राहकांसाठीच राबविली जाईल आणि शेवटी इतर चळवळींचे जे झाले, तेच ग्राहक चळवळीचेही होईल. भक्कम आधाराशिवाय कोणतीच चळवळ उभी राहू शकत नाही आणि तिची वाढही होऊ शकत नाही. अशा भक्कम आधाराचा शोध घेण्याचे आव्हानात्मक काम ग्राहक संघटनांना या पुढील काळात करावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment